लखनौ : इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने पहिल्या तीन षटकांत दोन धक्के देत श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल व पुनरागमन करणारा रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी करताना भारताचा विजय पक्का केला. भारताने श्रीलंकेवर ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील टीम इंडियाचा हा सलग १० वा विजय आहे.
इशान किशन आणि रोहित यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. १२ व्या षटकात लाहिरू कुमाराने ही भागीदारी तोडली. त्याने रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत केले. इशान व रोहितने पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. १७ व्या षटकात इशान बाद झाला. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. त्यानंतर श्रेयसने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला २ बाद १९९ धावांचा पल्ला गाठून दिला. श्रेयस २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात भुवीने पहिल्याच चेंडूवर पथूम निसंकाची विकेट घेतली. भुवीने टाकलेला चेंडू पथूमने बॅटने अडवला, परंतु तो सरपटत यष्टींवर जाऊन आदळला. टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा भुवी पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने कामिल मिशारा ( १३) याची विकेट घेतली. त्यानंतर वेंकटेश अय्यरने श्रीलंकेला तिसरा धक्का देताना जनिथ लियानागेला ( ११) संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. तीन महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानेही विकेट घेतली. त्याने दिनेश चंडिमलला १० धावांवर बाद केले. युझवेंद्र चहलने ११ व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दानुश शनाकाची विकेट घेतली. या विकेटसोबत भारताकडून टी-२० त सर्वाधिक ६७ विकेट्सचा विक्रम नावावर केला. त्याने जसप्रीत बुमराहला (६६) मागे सोडले.
वेंकटेशने आणखी एक विकेट घेतली. त्याने चमिका करुणारत्नेला ( २१) माघारी पाठवले. चरिथ असालंका एका बाजून खिंड लढवत होता आणि त्याने वेंकटेशने टाकलेल्या १८व्या षटकात २१ धावा चोपल्या. भुवनेश्वरने २ षटकांत ९ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेंकटेशने ३६ धावांत २ बळी टिपले. युझवेंद्र व जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. चरिथा असलंकाने सर्वाधिक ५३ धावांची नाबाद खेळी केली. असालंका सोडल्यास श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांकडून संघर्ष दिसला नाही. श्रीलंकेला ६ बाद १३७ धावा करता आल्या आणि भारताने ६२ धावांनी सामना जिंकला.
टी-20 आंतरराष्ट्रीय मधला टीम इंडियाचा हा लागोपाठ १० वा विजय आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. तसंच न्यूझीलंडचा ३-० आणि वेस्ट इंडिजचाही ३-० ने पराभव केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातली दुसरी टी-२० मॅच आता शनिवारी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी चुका सुधारा…; रोहित शर्माचा सहकाऱ्यांना स्पष्ट इशारा
भारताचा हा सलग १० वा टी-२० विजय आहे आणि ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण, रोहितने संघाच्या चुकांवर बोट ठेवताना सहकाऱ्यांना इशारा दिला. ”तुम्हाला असा पाठिंबा मिळाला, तर हे असे घट्ट नाते तयार होते. इशान किशनची क्षमता मी चांगली आहे आणि त्याला आज त्या क्षमतेने खेळताना पाहून आनंद झाला. सहाव्या षटकानंतर त्याची खेळी बहरत गेली. मैदानावर जाऊन त्याने फक्त चेंडू टोलवले नाही, तर गॅपमधून धावा काढल्या. रवींद्र जडेजासाठीही मी खूप आनंदी आहे. त्याच्याकडून आम्हाला अधिक अपेक्षा आहेत आणि म्हणून त्याला आज फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. पुढील सामन्यातही असाच प्रयोग तुम्हाला दिसेल. तो चांगल्या फॉर्मात आहे, विशेषतः कसोटीत आणि त्याचा आम्हाला मर्यादित षटकांच्या सामन्यात उपयोग करून घ्यायचा आहे, असे रोहित म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की, मला मोठ्या मैदानावर खेळायला आवडते, कारण तेथे फलंदाजाची खरी कसोटी लागते. कोलकातात तुम्हाला षटकार खेचण्यासाठी चेंडूला फक्त दिशा दाखवावी लागले. या सामन्यातही काही झेल सुटले आणि या स्तरावर हे अपेक्षित नाही. फिल्डींग कोचना त्यावर आता काम करावे लागेल. ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ मला हवा आहे.