मुंबई: जे निवडून येऊ शकत नाही ते लोक दुसऱ्या पक्षात चाललेत आणि जे निवडून येणार आहेत ते आमच्या पक्षात येतायत. संजय राऊत हे कोणाचे प्रवक्ते हे पहिल्यापासूनच आम्हाला माहीत आहे. पण मला असं वाटतं की, हाच विचार पंतप्रधानांबद्दल बोलताना संजय राऊतांनी करावा. आपली उंची किती, पंतप्रधानांची किती हे त्यांनी तपासावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांना दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, जनता भाजपसोबत आहे. जनतेनं देशात मोदीजींचं सरकार पाहिलंय. गोव्यात भाजपचं सरकार पाहिलंय. आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जनतेनं जवळून पाहिलंय. सर्व एकत्र येऊन काही फरक पडेल, असं मला वाटत नाही. गोव्यात शिवसेनेची अवस्था अशी आहे की, त्यांना कोणत्या तरी एका जागेवर डिपॉझिटही जप्त करण्यापासून वाचायचं आहे.
भारतीय जनता पार्टी पूर्णतः या निवडणुकीसाठी तयार आहे. आमची बूथपर्यंतची रचना झालेली आहे. कन्सल्टेशनची प्रोसेस आमची पूर्ण होतेय. प्रत्येक मतदारसंघात कोण उमेदवार असावा याकरिता कार्यकर्त्यांचं सीक्रेट बॅलेट पेपरनंही आम्ही ओपिनियन घेतोय. त्यामुळे आम्ही पूर्णतः तयार आहोत. त्यांची लढाई नोटाशीच आहे, पण NOTA हे जे नोटा आहे. ज्यात मतदार कोणालाही मतदान द्यायचं नाही, असं जे बटन दाबतो. ती जेवढी मतं असतात, त्यापेक्षा जास्त जरी मतं मिळाली पाहिजेत हे मला मान्य आहे. काही पक्षाला सोडचिठ्ठी देतायत, तर काही येतायत. ज्यांना लक्षात येतंय, ज्यांच्याविरुद्ध अँटी इन्कबन्सी असल्यामुळे भाजप त्यांना तिकीट देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मोदींचा ताफा रोखणे हे ठरवून केलेले कृत्य
पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींवरून फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एवढ्या कमी वेळात २५० लोक कसे आले? नरेंद्र मोदींचा ताफा रोखणे हे ठरवून केलेले कृत्य आहे. अधिकारी मोदीजींना भेटायला गेले नाहीत, याचा अर्थ त्यांना ताफा अडवला जाणार हे माहिती होते, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींवर काँग्रेस पक्षाच्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा यात सहभाग आहे हे स्पष्ट होत आहे. या घटनेला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? पंतप्रधानांचा ताफा रोखला याची चोकशी झाली पाहिजे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेले लॅप्स हे स्टेट स्पॉन्सर लॅप्स होते. यापूर्वी झालेल्या अशा घटना माहिती असूनही पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवरून पंजाब सरकारच्या मनात काय होते हे कळते, असा आरोप करत काँग्रेस पक्ष वागत आहे ते लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका फडणवीस यांनी केली.