स्पोर्ट्स

सौरव गांगुलीचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला सूचक इशारा

मुंबई : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक फटाके फुटले. त्याचा आवाज बीसीसीआयच्या कानठळ्या बसवणारा ठरला. विराटला ज्या पद्धतीनं वन डे कर्णधारपदावरून काढले गेले, त्यामुळे चाहत्यांमध्ये रोष होताच. त्यात विराटनं बुधवारी केलेल्या गौप्यस्फोटामुळे बीसीसीआयबाबतचा संताप अधिक वाढला. त्यामुळे आता बीसीसीआय आणि प्रामुख्यानं अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडून काय उत्तर येते, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यात गांगुलीनं प्रतिक्रिया दिली आणि त्यानं विराटला सूचक इशाराही दिला.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याचं विधान होतं की, बीसीसीआय आणि निवड समितीनं मिळून रोहितला वन डे संघाचा कर्णधार करण्याचा निर्णय घेतला. खरं सांगायचं तर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस ही विनंती मी स्वतः विराटला केली होती. पण, त्यानं तेव्हा नकार दिला. त्यानंतर ट्वेंटी-२० व वन डे संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार नसावेत, अशी निवड समितीची भूमिका होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.

त्यावर विराट काल म्हणाला, कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. मला कोणीही ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, अशी विनंती केलेली नाही.

विराटच्या या विधानानंतर एकच गोंधळ उडाला आणि आता बीसीसीआय किंवा गांगुली काय म्हणतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर सौरव गांगुली म्हणाला, माझ्याकडे या प्रकरणावर बोलण्यासारखे काहीच नाही. जे मी आधीच बोललोय. बीसीसीआय हे प्रकरण योग्यरीतीने हाताळेल, अशा शब्दात गांगुलीने इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button