मुंबई : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. त्यात मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आपण खूप दिवसांनी समोरासमोर आलो आहोत. गेल्यावर्षी राज्यभर शिवसंपर्क मोहीम राबवायची ठरवलं, पण दुसरी लाट आली. त्यानंतर माझं दुखणं सुरू झालं आणि आता कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या कोरोनाच्या लाटामागून लाटा येताहेत, पण आपल्याला शिवसेनेची लाट आणायची आहे. आपल्याकडे भगव्याचा वारसा आहे. दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न बाळासाहेबांनी दाखवलं, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आजचा दिवस म्हणजे सर्वांसाठी सण आहे. मी लहानपणापासून पाहतोय, दरवर्षी शेकडो लोक मातोश्रीवर यायचे. पण, आज आपण प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी ऑनलाइन भेटू शकतो. शेकडो हजारो लोक मला पाहू आणि ऐकू शकतात.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. मी आता आजारी आहे, पण लवकरच बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. भगव्याचे तेज आहे, हेच तेज विरोधकांना दाखवणार, या तेजानेच त्यांचा अंत होईल. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी आपले मित्र होते, आपण त्यांना पोसलं. मी मागे बोललो होतो, पंचवीस वर्षे आपली युतीमध्ये सडली, ते आजही बोलतोय. विरोधकांना राजकारणाचं गजकरण झालंय. शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळेस दिशा दाखवली, हिंदुत्वाची दिशा दाखवली. पण, विरोधकांचे पोकळ हिंदुत्व आहे. त्यांनी हिंदुत्वाचे काताडे पांघरले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, अनेकजण आपल्यावर टीका करतात की, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. पण आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आजचं यांचं जे हिंदुत्व आहे, ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे. वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव असतं तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय. २५ वर्ष यांना पोसल्यानंतर हे लक्षात आलं हे दुर्देव आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. ते कदापी सोडणार नाही. भाजपला आम्ही सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. विरोधक म्हणतात हा लोकशाहीचा अपमान आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, मर्द आहोत. आमची एकट्याने लढण्याची तयारी आहे, वेळ पडली तर बघू.
अमित शाह एकदा पुण्यात म्हणाले होते, एकट्यानं लढून दाखवा. आमची एकट्यानं लढायची तयारी आहे. आम्ही वीरासारखे लढू. हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि पक्ष जसे राजकारणात भिडतात तसं भिडा. आव्हान द्यायचं आणि मागे ती ईडीची पिडा लावायची, इन्कम टॅक्सची पिडा लावायची, है शौर्य नाही. त्यांनी तशी आव्हानं द्यायची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यांची पद्धत म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. एकेकाळी यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. तेव्हा यांनी प्रादेशिक पक्षांशी युती केली. आमच्याशी केली, अकाली दलाशी केली, सर्व पक्ष सोबत घेऊन अटलबिहारी वाजपेंयींनी सरकार चालवलं. आम्ही साथ दिली, काहीही करा पण जो भगवा फडकलाय तो उतरू देऊ नका. पण त्या भगव्याचं रंग पुसट होत चाललाय. हे हिंदुत्वाचा वापर स्वार्थासाठी करू लागलेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कधीकाळी भाजपचे डिपॉझिट जप्त होत होते, त्यावेळेस त्यांनी स्थानिक पक्षांची मदत घेतली. त्यांनी अनेक पक्षांची मदत त्यावेळेस घेतली. आम्ही त्यांना भगव्यासाठी साथ दिली, पण आता ते हिंदुत्व स्वार्थासाठी करत आहेत. सत्तेसाठी इकडे हिंदुत्ववादी पक्षासी युती करतात, तर कधी मेहबुबा मुफ्तीसोबत युती करतात, तर कधी संघ नको म्हणणाऱ्या नितीश कुमारांशी युती करतात. यांचे हे सोईसाठी राजकारण सुरू आहे. आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत युती केली होती, पण आता यांचे हे हिंदुत्व खरे हिंदुत्व नाही.
…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे. विविध राज्यात सोईचे राजकारण करतात. त्यांनी हिंदुत्वासाठी काही राज्यात गोवंश हत्या बंदी केली तर काही राज्यात ही सुरू ठेवली आहे. हे म्हणतात आम्ही लोकशाहीचा अपमान केला. पण, तुम्ही आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली.
कोणतीही दिशा नसलेलं पकाऊ भाषण; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपची सडकून टीका
स्वाभिमान, बाणा नी कणा
आता सारे सरले
उरल्या पोकळ बाता,
जळजळ, मळमळ
घरबसली फडफड
हेच उपद्व्याप
राहील्या केवळ वाफा— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2022
ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत. pic.twitter.com/pXVCjV83CR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2022
ठाकरे सरकारवर मुघल ए आझम-२ काढता येईल असे हिरवे वातावरण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2022
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. “नेहमीप्रमाणे भाजपबद्दलची मळमळ, जळजळ आणि कोहीती दिशा-धोरण नसलेले पकाऊ भाषण”, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच बाळासाहेबांना काँग्रेसकडून आंदरांजली वाहण्यात आलेली नसल्याचाही मुद्दा भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. पोकळ स्वाभिमान आणि बोगस हिंदुत्त्वाबद्दल बाता करणाऱ्यांना दिल्लीच्या मालकाने शिवसेनाप्रमुखांना यंदाही आदरांजली व्यक्त न करता फाट्यावर मारले आहे. हाच यांचा कणा नसलेला बाणा, असंही भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मग २ वर्षात काय कमावलं? प्रवीण दरेकरांचा सवाल
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. २५ वर्षे त्यांना वाटलं नाही की सडलो आणि दोन वर्षात त्यांना वारंवार साक्षात्कार होतोय. त्याचं कारण सत्ता असूनही जी घुसमट, जे वैफल्य बाहेर पडताना दिसत आहे. २५ वर्षे भाजपसोबत सडली, तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, याचं आत्मपरीक्षण करा. मग अस्वस्थता का आहे? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? भाजपवर तर परिणाम नाही. राज्यातील सगळ्या निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर आहे. तुमच्याशिवाय आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत आणि तुम्ही चौथ्या नंबरवर आहात हे लक्षात घ्या, अशी टीका दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
चांगलं वागवलं म्हणूनच तुम्ही २५ वर्षे तुम्ही संसार केला. आता तुम्हाला कसं वागवलं जात आहे. आता सरकारमध्ये आहात, पण सरकारचं सुख ना महाराष्ट्राला ना शिवसैनिकांना. मला सांगा, सरकार असूनही आपल्या आमदारांना किती निधी मिळाला याची आकडेवारी जाहीर करा सामनातून, शिवसैनिकांना कुठल्याप्रकारे लाभ मिलाला हे जाहीर करा. त्यांच्यात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांसाठी दोन अडीच लाख कोटी रुपये निधी नेला. त्यानंतर काँग्रेस आणि मग शिवसेना. त्यावरुन सरकारमध्ये काय चाललं आहे हे आपल्या लक्षात येतं, असा खोचक टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.