Top Newsराजकारण

संभाजी ब्रिगेडचे भारतीय जनता पक्षासोबत युतीचे संकेत

मुंबई : राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर शिवसेना-भाजपा वेगळे झाले आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठी सत्तापालट झाल्याचं दिसून आलं. सत्तेसाठी शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी भूमिका मवाळ करत किमान समान कार्यक्रम आखला आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर आता आगामी काळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात मराठा समाजाची सर्वात मोठी संघटना असलेली मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला भाजप हादेखील एक युतीचा पर्याय असू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी लेख लिहून ही भूमिका मांडली. त्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आगामी काळात भाजपासोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येते.

खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकात केलेल्या पुढील राजकीय स्थितीचा उहापोह केला आहे. त्यात संभाजी ब्रिगेडला आगामी काळात भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या आमदार होत्या. परंतु तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीवर टीका करत होते. खेडेकर आणि भाजपा विरोध यांचे अनेक किस्से आहेत.

या लेखात खेडेकर म्हणतात की, युवक आणि महिला यांना आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात ऊर्जेची गरज आहे. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी धडपड सुरू पाहिजे. पैशाचे सोंग करता येत नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण झाले आहे. हे बदलायचे असेल तर संभाजी ब्रिगेड राजसत्तेत आणणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी राजनैतिक संबधात वाढ वा युती याबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिग्रेडला दूर ठेऊन केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहित धरून आहेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच भाजप सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे. तर काही लहान पक्षनेते संभाजी ब्रिगेडबाबत गैरसमज पसरवत असतात. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो. तसे संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्याच अर्थाने भाजपाला अस्पृश्य मानले जाते. मराठा सेवा संघ आणि आरएसएस यांची तत्वे पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. परंतु राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्व असते. याठिकाणी कोणीही कायमस्वरुपी मित्र व शत्रू नसतात. वेळ आणि संधी हेच राजकीय सत्य आहे. लोक काय म्हणतील यावर राजकारण केले जात नाही. शिवसेना-भाजपा आज राणे प्रकरणामुळे एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत. पण सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यासाठी तडजोड होऊ शकते असंही खेडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सध्या महाविकास आघाडी सरकार उदाहरण आहे. आता स्वबळावर राजकारण हे मत भूतकाळ जमा झाले. पहिले प्राधान्य समविचारी पक्षांनाच आपला स्वाभिमान सांभाळून देणे याबाबत दुमत नाही. पण जमलेच नाही परस्परविरोधी पक्षासोबत युती व वाटाघाटी करुन योग्य निर्णय घ्यावा लागतो. गेल्या काही वर्षापासून तत्ववादी मोठमोठे राजकीय नेते तसेच पक्ष तत्व व आदर्श गुंडाळून राजकारण साधत आहेत. आजतरी संभाजी ब्रिगेडला सत्तेसाठी काही ना काही तडजोड करावीच लागेल. याबाबत गंभीरपणे विचार करुन योग्य भूमिका आणि निर्णय घ्यावा ही सूचना आहे. संभाजी ब्रिगेड हा सर्वच राजकीय पक्षांना जबरदस्त पर्याय आहे. संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांनी आपली सर्वच ताकद वाढवलीच पाहिजेत. स्वबळावर वा युतीत जास्तीत जास्त जागा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिंकल्या पाहिजेत. त्यासाठी पुढील काळात फक्त आणि फक्त १०० टक्के राजकारण करावे कारण राजकारण हेच समाजकारणाचे अंतिम उदिष्ट आहे असा राजकीय सल्ला पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला दिला आहे.

राजकारणात शिवसेना-काँग्रेस हे कट्टर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ शकतात मग इतरांना का येऊ नये? काँग्रेस-राष्ट्रवादी जर संभाजी ब्रिगेडला गृहित धरणार असेल आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असेल संभाजी ब्रिगेडला काही राजकीय तडजोडी करून वेगळा पर्याय शोधावा लागेल. किमान समान कार्यक्रमाप्रमाणे भाजपासोबत युती होऊ शकते असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे.

मराठा सेवा संघाची १ सप्टेंबर १९९३ रोजी अकोला इथं स्थापना करण्यात आली. मराठा सेवा संघाची काळानुरुप विविध सलग्न संघटना स्थापन झाल्या. तरुणाईंसाठी संभाजी ब्रिगेड जी सध्या राजकीय पक्ष म्हणून काम करतेय. महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड अशा विविध ३३ संघटना तयार झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेचा घोळ मिटवण्यासाठी शासनास मराठा सेवा संघानेच भाग पाडले. संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर केलेला हल्ला खूप गाजला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button