मुक्तपीठ

सिध्दूच्या एन्ट्रीने पंजाब काॅंग्रेसमध्ये घमासान

- राजाभाऊंचा टाॅवर (राजेंद्र त्रिगुणे)

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना शह देण्यासाठी काॅंग्रेसने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दूच्या गळ्यात पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातल्याने पंजाबात आता कॅप्टन विरूद्ध नवज्योतसिंग असा सामना सुरू झालाय, परिणामी पंजाबात काॅंग्रेस अंतर्गत मोठं घमासान सुरू झाले आहे.

नवज्योतसिंग सिध्दू यांनी भाजपमध्ये बंड करून काॅंग्रेसचा रस्ता पकडला त्यावेळी व नंतर अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत सिध्दू कॅप्टनची तोंड फाटेपर्यंत कौतुकास्पद शाब्दिक पुल बांधण्यात मश्गूल होते,पण हा शब्दांचा पुल खऱ्याअर्थाने कोसळला तो पाकिस्तानमधील काॅरिडाॅरच्या उद्घाटन कार्यक्रमात.या कार्यक्रमात सिध्दू यांनी जाऊ नये असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना वाटते होते तसे त्यांनी जाहिरपणे सुचितही केले पण नवज्योतसिंग सिध्दू आपलंच खर केलं.

मुख्यमंत्री असूनही आपल्या मंत्रीमंडळातील एक कॅबिनेट मंत्री आपलं ऐकत नाही उलटपक्षी मंत्रीच आपल्या 👃 नाकावर टिच्चून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानबरोबरचा क्रिकेटचा दोस्तांना कायम ठेऊन गळाभेट घेतो शिवाय खानाची भलामन करतो ही गोष्ट कॅप्टन अमरिंदर यांच्या गळी उतरली नाही.परिणामी कॅप्टन अमरिंदर यांनी सिध्दू यांच्याकडे असणारी महत्वाची खाती काढून घेतली आणि चुकीला क्षमा नाही असा इशाराच दिला, कालांतराने नवज्योतसिंग यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कॅप्टन अमरिंदर यांच्या विरोधात दोन हात करण्याची तयारी दाखवली तेंव्हापासून या दोघांमध्ये सातत्याने राजकीय हमरीतुमरी होत आहे .

नवज्योतसिंग सिध्दू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्यावतीने पंजाबवासियांना जे आश्वासन दिले होते त्यापैकी कोणत्याही आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याचा आरोप केला.

पंजाबात पुढच्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत परिणामी आतापासून आश्र्वासन पूर्तीचा कार्यक्रम हाती घेतला तरच काॅंग्रेसला यशाची चव चाखता येईल अन्यथा कडू कारल्याची भाजी खावी लागेल हे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात व आपल्या पदरात प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यात नवज्योतसिंग सिध्दू यशस्वी झाले अर्थात हा त्यांचा राजकारणातील पहिला षटकार.

नवज्योतसिंग सिध्दू यांचे पिताश्री स्व.सरदार भगवंत सिंग हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चांगले मित्र होते म्हणूनच त्यांनी आलिशान घराचा त्याग करून ते पंजाबच्या दोन्ही सभागृहात आलटून पालटून आमदार झाले, शिवाय ते अॅडहोकेट जनरलपदी विराजमान होते.या सर्व पार्श्वभूमीवर सिध्दू यांच्या घराण्याचे गांधी कुटुंबाबरोबर चांगले संबंध आहेत याचाच फायदा नवज्योतसिंग सिध्दू यांना प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यात नक्कीच झाला.

नाहीतर काॅंग्रेसनेत्रुत्व कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापुढे सहजासहजी डोळे विस्फारत नाही पण नवज्योतसिंग सिध्दू यांची शिडी मिळाली आणि पंजाबमध्ये सत्तेच्या 🐍 सापशिडीचा खेळ सुरू झाला आहे.हा खेळ निवडणूकपर्यंत असाच चालू राहिलं पण नंतर मुख्यमंत्री अमरिंदर फणा काढल्याशिवाय राहणार नाहीत, तोपर्यंत अमरिंदर यांचं मुख्यमंत्रीपदही शाबुत असेल.नवज्योतसिंग यांच्या निवडीने अमरिंदर सिंग अडचणीत आले असले तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदापासून तुर्त दिलासा मिळाला आहे.तथापि तो पुढे कायमचा नक्कीच असणार नाही. मुख्यमंत्री अमरिंदर आता ऐंशीच्या उंबरठ्यावर आहेत परिणामी काॅंग्रेस नेत्रुत्व सिध्दू यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहे.पण हे गणित काॅंग्रेसला वाटत तितके सोपे नाही ,कारण या पक्षात तरूण तुर्कच अधिक आहेत आणि त्यांचा पाठिंबा अर्थात कॅप्टनलाच असणार.नाहीतर पंजाबमध्ये शंभरीकडे झुकत चाललेले माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल या वयातही राजकारणात सक्रिय आहेत . इकडे महाराष्ट्रात जसा वयाचा बागुलबुवा केला जातो तसा तिकडे केला जात नाही हे विशेष म्हणावे लागेल .

यासर्व पार्श्वभूमीवर नवज्योतसिंग सिध्दू हे जर भाजपमध्ये असते तर त्यांना चांगले दिवस आले असते.मागच्या लोकसभा निवडणुकीत सिध्दू यांच्या जागी माजी केंद्रीय अर्थमंत्री स्व.अरूण जेटली यांना उमेदवारी दिली आणि सिध्दू यांचा इगो दुखावला, लागलीच त्यांनी जेटलींवर आगपाखड करीत भाजपला सोडचिठ्ठी दिली .याच जेटलींनी नवज्योतसिंग सिध्दू यांना खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी आपलं विधी कौशल्य पणाला लावले होते, हे मात्र सिध्दू विसरले यालाच एहसान फरामोश म्हणतात दुसरं काय ॽ गुरुनामसिंग यांचा जाणते अजाणतेपणी खुन झाला त्यातून अजून सिध्दू सुटले नाहीत,या खटल्याची फेरयाचिका अजूनही सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे त्यामुळे नवज्योतसिंग सिध्दू यांनी पंजाब काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालो म्हणून फार उर बडवून घेऊ नये.शेवटी आगे आगे देखो होता है क्या ॽ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button