Top Newsराजकारणसाहित्य-कला

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी आज पहाटे ५.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडूलकर, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.

‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट-जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने ‘वन्ही तो चेतवावा। चेतविता चेततो।’ या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली.

बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

जाणता राजा महानाट्याचे निर्माते

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.

बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभे राहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अभ्यासक, संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला.

असा घडलं शिवचरित्र

रात्ररात्र दप्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी जवळ पैसे नव्हते. मग, पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी ‘मराठा’तल्या अग्रलेखात लिहिले, “हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके सुंदर झाले आहे.

शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान झाले ते नागपूरला. २५ डिसेंबर १९५४. शिवचरित्रावरच्या त्या भाषणाला शंभर एक लोक उपस्थित होते. पुढे शिवचरित्रकथन हा त्यांचा ध्यास घेऊन ते जगभर फिरले. आज वयाची ९९ वर्षे पार झाली, तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरू होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते की, “बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावे तर तिचे कार्य महाराष्ट्रभर पसरलेले आहे. संस्था म्हणावे तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे.

इतिहास अन् सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी : नरेंद्र मोदी

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील, असं मोदींनी म्हटलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बाबासाहेबांचे योगदान विसरून चालणार नाही : शरद पवार

शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी ज्यांनी शेकडो व्याख्याने दिली आणि या संबंधीची आस्था तरुणांच्या मनात निर्माण करण्याची ज्यांनी काळजी घेतली, असे योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. यामध्ये एका गोष्टीचे समाधान म्हणता येणार नाही, पण ते दीर्घायुषी होते. वयाची १०० वर्ष पूर्ण करत असतांना सतत लोकांशी संवाद सुरु ठेवणे, हे यश लोकांच्या सेवेमुळे त्यांना मिळाले, परंतु ते आज नाहीत, याची अस्वस्थता, दुःख अनेकांच्या मनात आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पवार म्हणाले, त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहार जो राज्यासमोर ठेवला. त्यात काही प्रमाणात वादग्रस्त मुद्देही होते. याबद्दल मत व्यक्त करतांना, मी स्वतः काही जाणकार नाही, इतिहासाच्या संबंधित तज्ज्ञ नाही. हे जरी खरं असलं, तरी इतकी मोठी कामगिरी कुणीही करतो, त्यासाठी आयुष्य खर्च करतो आणि त्याच्यामध्ये काही लोक दोष काढण्याचा प्रयत्न करतात. हे कदाचित त्यांच्या बाबतीतही केले गेले. मात्र त्यांचे योगदान विसरून चालणार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

तेजस्वी शिवतारा निखळला : राज्यपाल कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले. अलीकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असताना व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही : उद्धव ठाकरे

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

एक अध्याय पडद्याआड : अजित पवार

ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले : नितीन गडकरी

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. तसेच एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे.

गडकरी पुढे म्हणाले की, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते. आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता. आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

बाबासाहेबांनी मोडून- तोडून इतिहास कधीच सांगितला नाही : फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच. नुकतेच त्यांचे १०० व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा. बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता. बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता.ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button