शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचे शिवसेनेकडून स्वागत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीचं शिवसेनेकडून स्वागत करण्यात आलंय. महाविकास आघाडी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलंय. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यांनी म्हटलंय.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. या भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन सध्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या नेत्यांना पोटशूळ उठत आहे. ते संकुचित मनाचे झाले आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी दिलदारी लागते. मृणाल गोरे आयुष्यभर शिवसेनेच्या विरोधात लढल्या, पण त्या पुलाला मृणाल गोरे यांचंच नाव दिलं, असं सावंत म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. भाजप आणि रिपाईंकडूनही या प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा देण्यात आलाया. तर शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम आहेत.




