Top Newsराजकारण

चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय; संजय राऊतांचे जोरदार टीकास्त्र

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव घेऊन केलेल्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री त्याचं नाव सांगावं, असं सांगतानाच पाटलांना अफवा पसरवण्याची सवयच आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंकडे क्षमता

नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

भाजपने गुजरातचा मुख्यमंत्री बदलला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याचा मुख्यमंत्री बदलणं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले. यापूर्वी काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलले. हा त्या पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. त्यावर इतरांनी बोलू नये. पण एक सांगतो गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही. पाच वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं. ते बहुमत आणण्यात आलं. बिहारमध्ये शेवटच्या क्षणी काही जागा जशा खेचून आणल्या तेच गुजरातमध्ये झालं, असा चिमटा काढतानाच पक्ष मजबूत करणं हा त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित होणार नाही, असंही ते म्हणाले.

गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग

गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये २० जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार सुरु असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. गोव्यामध्येही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरु असून येत्या काळात त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खासदार राऊत म्हणाले की, गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार सुरु आहे. त्याला कितपत यश येतं हे आताच निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button