जन आशीर्वाद यात्रेवरून संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/06/sanjay-raut-1.jpg)
मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. नारायण राणे यांनी दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. तो स्थानिक प्रश्न आहे, स्थानिक नेते त्यावर बोलतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर स्वातंत्र्यवीर स्मारक आणि इंदू मिल येथेही भेट दिली होती. यानंतर ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी याला बगल दिल्याचे पाहायला मिळाले.भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, नाही माझ्या काही वाचनात आले नाही, असे सांगितले. पुढे पत्रकारांनी त्यांना घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पुन्हा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, आमचे शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार यावर बोलतील. हा स्थानिक प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.