पालघर : महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाख रुपये दंडाची शिक्षा दिलीय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता. त्यानंतर आत राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
खा. राजेंद्र गावित यांना ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला होता. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती.
डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वतःचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.