शिवसेना खा. प्रियंका चतुर्वेदींचा संसद टीव्हीच्या अँकरपदाचा राजीनामा
नवी दिल्ली: शिवसेना खा. प्रियंका चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. चतुर्वेदी संसद टीव्हीच्या अँकर आहेत. राज्यसभेतून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी अँकरपदाचा राजीनामा दिला आहे. ‘सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी पायउतार होत आहे. संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दलदेखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे,’ असं चतुर्वेदींनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
राज्यसभेत गदारोळ केल्यानं १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, तृणमूल आणि डाव्या पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर चतुर्वेदींनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. गुन्हेगारांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळते. पण आम्हाला तीदेखील मिळाली नाही, अशा शब्दांत चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली.
राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.
११ ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ २१ टक्के, तर राज्यसभेत केवळ २८ टक्के कामकाज झालं.