राणेंच्या सत्तेची गुर्मी उतरवली; आ. वैभव नाईकांचा घणाघात

कणकवली : नारायण राणे गेले कित्येक वर्षापासून पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून लांब पळत होते. कालच्या प्रकाराने राणेंची गुर्मी उतरवली, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आमदार वैभव नाईक यांनी केली.
वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. नारायण राणे हे गेले कित्येक वर्ष आपल्या पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून पळत होते. मात्र हे सरकार कायद्याने चालणारे सरकार आहे. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हे या सरकारने राणेंना दाखवून दिलंय. त्यामुळे कालच्या प्रकरणात राणेंची गुर्मी उतरवली गेली, असा हल्ला नाईक यांनी चढवला.
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली. परब यांची भूमिका कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे. राणे आपण केंद्रीय मंत्री आहोत याचा बडेजाव दाखवत होते. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई करताना त्यांच्या पाठीशी राहणं म्हणजे दबाव नाही. खरं तर ही कारवाई नाशिक पोलीसांनी केलीय. पालकमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी राहण त्यांच काम आहे, असं नाईक यांनी स्पष्ट केलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. गेल्या पाच वर्षापासून चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांची सगळ्यांना कोर्टात खेचू, ईडी लावू हीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे लोकांनीच यांना सत्तेतून बाहेर फेकलं. आता पुढच्या काळात भाजपला सत्तेच्याच बाहेर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर फेकण्याची लोकांची भूमिका आहे हे चंद्रकांत पाटीलांनी ध्यानात घ्यावं, असा इशाराही त्यांनी दिला.
सिंधुदुर्गातील जमावबंदीवरही त्यांनी भाष्य केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचा आदेश का लागू केला हा त्यांचा विषय आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असू दे किंवा कोव्हिडचा काळ असू दे, त्याबाबतची भूमिका जिल्हाधिकारी ठरवतात. मात्र राणेंच्या यात्रेला कोणी अडवलं नाही. त्यांनी यात्रा का बंद ठेवली हा त्यांचा प्रश्न आहे. लोकांचा आशिर्वाद या यात्रेला आता मिळत नसेल म्हणून यात्रा बंद ठेवली असेल, असा टोला नाईक यांनी लगावला.