Top Newsराजकारण

…तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती !

खा. संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज असते तर विरोधकांची जी काही कावकाव, चिवचिव, फडफड आणि तडफड थांबली असती, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. आज जे काही घडत आहे, घडवलं जात आहे ते केवळ बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच घडतंय, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आजची शिवसेना वेगळी आहे या आरोपाचंही त्यांनी खंडन केलं. शिवसेना वेगळी कशी असेल? आजही बाळासाहेबांची प्रेरणा हाच आमचा ऊर्जा स्त्रोत आहे. पिढी बदलते त्यानुसार संघर्षाची प्रतिकं बदलतात. पण विचार तोच राहतो. बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांचीच राहणार. ती दुसऱ्या कुणाचीच होऊ शकत नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना आज बाळासाहेब असते तर काय चित्रं असतं? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज बाळासाहेब असते तर तुम्ही म्हणता काय झालं असतं… बाळासाहेबांचा स्वभाव हा ‘सौ सोनार की एक लोहरकी’ असा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता. बंदुकीची गोळी होती. ती वेधच घ्यायची. नेम चुकत नव्हता कधी, असं राऊत म्हणाले.

बाळासाहेब आज असते तर ९६ वर्षाचे असते. त्यांचा वाढदिवस आम्ही राज्यात, राज्याबाहेर अनेक वर्ष उत्सवाच्या स्वरुपात साजरा करत आलो. बाळासाहेबांविषयी बोलताना आजही वाटतं ते आमच्या आसपास आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेतूनच जे घडतंय सगळं ते घडवलं जातंय. बाळासाहेबांनी महाराष्ट्र आणि देशाला केवळ राजकीय दिशा दिली असे नाही, अनेक गोष्टी दिल्या. त्या शिदोरीवर महाराष्ट्र आणि देश पुढे चालला आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाला स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात लढण्याचं बळ बाळासाहेबांनी दिलं. देशाला तुम्ही हिंदू आहात आणि हा देश हिंदुंचा आहे ही ओळख प्राप्त करून दिली. आज कोणी काही म्हणू द्या. गर्व से कहो हम हिंदू है, मराठी आहोत हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी महाराष्ट्र अभेद्य आणि अखंड ठेवला. ते होते तोपर्यंत कुणाचीही पोपटपंची चालली नाही. अर्थात आताही चालणार नाही कारण अजूनही बाळासाहेबांचा विचार कायम आहेत, असं त्यांनी सांगितलं.

राजकीय मतभेद असतीलही. पण प्रत्येक राजकीय नेत्याला वाटायचं बाळासाहेबांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं. जे भेटू शकले नाहीत ते आजही हळहळतात. आम्ही आयुष्यात सर्व काही पाहिलं अनुभवलं पण बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. हे बाळासाहेबांच्या जीवनाचं सर्वात मोठं यश आहे प्रत्येकाला त्यांच्या जवळ जावंसं वाटतं होतं, असं ते म्हणाले.

मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणी राहिल. मराठी आहे हे जे आपण देशात अभिमानाने सांगतो त्याचं सर्व श्रेय बाळासाहेबांच्या त्यागाला आणि संघर्षाला आहे, असं सांगतानाच त्यांनी कधी कुणावर अन्याय होऊ दिला नाही. ते सत्य न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतिक होतं. त्यांचं जीवन म्हणजे अग्निकुंड होते. त्यातून त्यांनी महाराष्ट्रातील विचाराचा वणवा पेटत राहिला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोदी, शहा, फडणवीसांवर फटकारे लगावले असते

राजकारणातील मॉडल्स गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रं काढणं थांबवलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी, नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे राजकीय पटलावर आले. त्यावेळी व्यंगचित्रासाठीची ही मॉडेल्स मी मिस केली असं बाळासाहेब म्हणायचे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अमित शहा आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत… बाळासाहेब असते तर यांच्यावर त्यांनी हातात कुंचला घेऊन नक्कीच फटकारे लगावले असते, असं राऊत यांनी सांगितलं.

बाळासाहेबांनी कुंचला हाती ठेवला तेव्हा त्यांच्या हाताला त्रास व्हायचा. एकेकाळी मी कुंचला हाती घेतला की अनेकजण थरथरायचे. आज माझे हात थरथरत आहेत. प्रेरणा देणारे मॉडल्स मला आता दिसत नाहीत असं ते म्हणायचे. चर्चिल, नेहरू, जॉर्ज फर्नांडिस, सरदार पटेल, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई, एसके पाटील ही सर्व मोठी माणसं देशाच्या राजकारणात होती. व्यंगचित्रं काढताना ही बाळासाहेबांची मॉडेल्स होती. ही लोकं गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. त्यामुळे बाळासाहेबांना चित्रं काढायला त्यांच्याकडे मॉडल्स नव्हती. पण अचानक राजकारणात सोनिया गांधी आल्या, नरसिंह राव आले, सीताराम केसरी आले तेव्हा ते म्हणाले, अरे रे मी ही मॉडल्स मिस केली. मी व्यंगचित्रं सोडली आणि माझी मॉडल्स परत आली. आजही मोदी आहेत, अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत… आता राज्यात आणि देशात गडबड सुरू आहे, बाळासाहेब असते तर त्यांना कुंचला हातात घेऊन स्ट्रोक्स… फटकारे नक्कीच मारावेसे वाटले असते, असं राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यावरील बाळासाहेबांच्या प्रभावाचे पदर उलघडले. माझ्या आयुष्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. ते नसते तर मी नसतो. त्यांचा आशीर्वाद मला लाभला नसता तर तुम्ही जे कॅमेरा घेऊन गेले अनेक वर्ष माझ्याशी बोलता ते संजय राऊत तुम्हाला कधीच दिसले नसते. त्यांनी माझ्या सारख्या मातीच्या गोळ्याला घडवून आकार दिला. सामनाचा संपादक, शिवसेनेचा नेता म्हणून मला फार तरुण वयात जबाबदारी दिली, शिवसेनेच्या नेतृत्व मंडळात घेतलं. मी २८ वर्षाचा असतानाच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी माझी निवड केली. त्यांनी मला राज्यसभेत पाठवलं होतं. सतत त्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला. मी बिघडू नये यासाठी त्यांचा हंटर सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता. ते मनाने खूप मोठे होते. विचारानेही महान होते. सामान्यातील सामान्य माणसाला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्या सहवासात होती. कितीही खचलेला माणूस असो त्यांच्या सहवासात राहून शूरवीर होत असायचा, असं ते म्हणाले.

गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. लिहून देतो… त्यांना काहीही करू द्या. गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.

त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी लिहून देतो, कालही सांगितलं होत गोव्यात भाजपला बहुमत नाही मिळणार. फार काय तोडफोड करतील, खरेदी विक्री करतील, आलेमाव गेलेमावला घेऊन येतील पण बहुमत मिळणार नाही. बहुमत न मिळणं आणि सरकार बनवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जनता तुम्हाला रिजेक्ट करेल आणि तरीही तुम्ही सरकार बनवणार हे लोकशाही विरोधी असेल, असं राऊत यांनी सांगितलं. गोव्यात आम्ही १२ जागा लढत आहोत. राष्ट्रवादी ७ किंवा ८ जागा लढणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं. मी शेलारांना उत्तर दिलं आहे. विरोधक-सत्ताधारी एकमेकांना चहा पाजत असतात. आमची वैक्तिगत दुश्मनी नसते. शेलारांची भूमिका असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह अनेक राज्यात भाजपचे डिपॉझिट गूल झालं आहे. तरीही ते लढत आहेत. त्याचा हिशोब घ्यावा लागेल. लोकशाहीत निवडणुका लढणं हा आमचा अधिकार आहे. एखाद दुसरी निवडणूक हरलो म्हणजे निवडणूक लढायची नाही असं काही संविधानात लिहिलं नाही. लढत राहू. एक दिवस गोव्यात आमचं राज्य येईल, असं ते म्हणाले.

माफिया भाजपचा नवा चेहरा

मी आज नाही गेल्या अनेक वर्षांपासून गोव्याचं राजकारण जाणून आहे. उत्पल पर्रिकर असो लक्ष्मीकांत पार्सेकर हे दोन प्रमुख नेते आणि तिसरे श्रीपाद नाईक तेही नाराज आहेत. पार्सेकर आणि मनोहर पर्रिकर हे गोव्यातील भाजपचे प्रमुख नेते होते. २५ वर्षापूर्वी प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी भाजपला मोठं केलं गोव्यात. दोन्ही नेत्यांनी त्याग केला. दोन्ही नेते गोव्यातील भाजपचे मुख्य चेहरा होते. आज उत्पल पर्रिकर आणि पार्सेकर यांनी पक्ष सोडला आहे. आज माफियांना भाजपने नवा चेहरा बनवला आहे. पण गोव्यातील जनता सर्व पाहत आहेत, असंही ते म्हणाले.

चंद्रकांतदादांना शुभेच्छा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यावरूनही त्यांनी त्यांना फटकारले. करू द्या मागणी. त्यांचा वेळ जात नाही सध्या. पुढील तीन वर्ष त्यांना हेच करायचं आहे. सरकारला दोन वर्ष होऊन गेली. तीन वर्ष चालेल. विरोधी पक्षाकडे काही काम उरलं नाही. विरोधी पक्ष हा ताकदीनं फार मोठा आहे. त्यांनी विधायक काम करायचं ठरवलं तर चांगलं काम करू शकतात. पण त्यांच्याकडे वेळ घालवायचं काहीच साधन नसल्याने अशा प्रकारचे उद्योग करत आहेत. त्यात राजभवनाला सामील करून घेत आहेत. करू द्या त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

निवडणूक प्रचार रॅलींवरील बंदी कायम आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सोय केवळ भाजपची आहे. मला वाटतं. त्यांच्या सभांना गर्दी जमणार नाही बहुतके. पंतप्रधानांच्या उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील सभांना अजिबात गर्दी जमली नव्हती असं म्हणतात. त्यामुळे त्यांची सोय आहे का हे थोडं तपासून पाहावं लागेल, अशी खोचक टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button