
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. याच विषयावर संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. दोन्ही राजांमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना दोन्ही राजांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. यानंतर शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया आली असून, दोन्ही राजे एकत्र आले. त्याचे स्वागत, पण त्यांचे बोलणे भाजपच्या मिठाला जागल्यासारखे आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच आक्रमक पद्धतीने भूमिकाही मांडली. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या भेटीवरून टोला लगावला आहे. दोन्ही राजे एकत्र आले याचे स्वागत आहे, मात्र दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबाबत ते बोलत नाहीत. ते मिठाला जागल्यासारखे बोलत आहेत, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला. या वेळी खासदार अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवर देखील भाष्य केले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यघटनेनुसार निर्णय घेतला पाहिजे. मात्र यात केवळ राजकारण करण्याचे कामच सध्या सुरू आहे. यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, असा आरोप खासदार सावंत यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. कुठल्याही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पण राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे. राजे हे सर्वांचे अर्थात सर्व समाजाचे असतात, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.