मुंबई : राज्यातील नगपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यात सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. त्या खालोखाल भाजपनेही नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारली. राज्यातील महाविकास आघाडीनं भाजपाला धक्का दिला असला तरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातले लढले होते.
नगर पंचायतीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकत्रित लढण्याची इच्छा होती. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं, पण भाजपनेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या.सत्तेतील काँग्रेस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेसनं ३१६ जागा पटकावल्या तर मुख्यमंत्री असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेनेला २८४ जागा जिंकता आल्या.
नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत अंतर्गत नाराजी पसरली आहे. विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जयस्वाल यांनीही पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं विधान केले आहे. जयस्वाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेला योग्य ते स्थान मिळालं नाही. पक्षाने काळजी घेणं गरजेचे आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भविष्यात शिवसेनेसाठी हे धोकादायक आहे. पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं.