मुक्ताईनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे यांनी या हल्ल्याची आपबिती कथन केली आहे.
रोहिणी खडसे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी एकनाथ खडसेदेखील उपस्थित होते. तीन दुचाकीवरून सात जण आले. यात तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार तर तिसऱ्या च्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले.
एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्यावर जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचेही या वेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहीन, असेही खडसे यांनी सांगितले.
राजकीय वैमनस्यातून, वादातून शिवसेना पदाधिकार्यांनी हा हल्ला केला असे सांगत हल्ला करणार्यांची नावेही यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितली. यात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई या तीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे खडसेंनी सांगितले.
रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली.