राजकारण

फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली

बुलडाणा : राज्यात कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं होत असून रोजच्या रोज शेकडो माणसं या आजाराला बळी पडत आहेत. त्यातच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र, त्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप नेते राज्य सरकारची सतत अडवणूक करत असल्याची सत्ताधारी महाआघाडीतील लोकप्रतिनिधी व नेत्यांची भावना झाली आहे. त्यामुळं संतप्त झालेले शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.

कोरोनाच्या संकटातही भाजपचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रातील भाजपच्या लोकांचं भयंकर राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. फडणवीस, दरेकर आणि चंपा (चंद्रकांत पाटील) हे राजकारण करत आहेत. कोरोना हा पक्षाचा कार्यकर्ता पाहून होत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी पाहून होत नाही. प्रत्येक जातीधर्माच्या माणसाला हा विषाणू विळखा घालून बसलेला आहे. भाजपच्या १०५ आमदारांना आणि २० खासदारांना महाराष्ट्रानं मतदान केलंय हे त्यांनी विसरू नये. महाराष्ट्राला रेमडेसिविरचं इंजेक्शन, लस देऊ नका अशा धमक्या भाजपवाले कंपन्यांना देताहेत. ऑक्सिजनची वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. पक्षाच्या कार्यालयातून गुजरातला इंजेक्शन दिली जाताहेत. पण महाराष्ट्राला देण्यासाठी यांच्याकडं इंजेक्शन नाहीत. अशा प्रकारचं राजकारण भाजपकडून केलं जातंय. या देशात काय, जगातही असलं राजकारण कोणी केलेलं नाही,’ असं गायकवाड म्हणाले.
‘बांगलादेश, पाकिस्तानला देण्यासाठी यांच्याकडं लसी आहेत. महाराष्ट्र राज्य हे त्यांना पाकिस्तान व बांगलादेशपेक्षा कमी महत्त्वाचा वाटतो का? पंतप्रधान मोदी व फडणीवसांना काहीतरी वाटलं पाहिजे. नरेंद्र मोदी, फडणवीस मुख्यमंत्री असते, हे चंद्रकांत पाटील मंत्री असते तर अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं असतं?,’ असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.

भाजपच्या नेत्यांबद्दल असलेली चीड त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. ‘मला करोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे. ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजतं की करोना काय आहे. त्यामुळं भाजपच्या लोकांनी राजकारण थांबवावं,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. महाराष्ट्र जगला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. माणसंच मेली तर तुम्हाला शिक्के कोण मारणार? कोण मतदान करणार तुम्हाला?,’ असंही गायकवाड यांनी सुनावलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button