अभिमन्यू काळेंच्या बदलीला शिवसेना नेत्याचाच थेट विरोध

मुंबई : शिवसेनेचे उपनेते माजी खाजदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी ठाकरे सरकारला थेट आव्हान दिले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणात राज्य सरकारने अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या बदलीला आढळराव-पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. अभिमन्यू काळे यांची बदली अतिशय चुकीची आणि निषेधार्ह आहे, असं आढळराव-पाटील यांनी म्हटलं आहे.
आढळराव-पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, अभिमन्यू काळे यांना मी जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून, त्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरं जावं लागलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एका प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे. जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं.
अभिमन्यू काळे यांची बदली
रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवारी २० एप्रिलला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एफडीए आयु्क्त काळे यांनी दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.