
मुंबई : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत पंतप्रधान मोदींना डिवचून गेले, त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका करतही चौफेर बॅटींग केली. त्यांनी उत्तर प्रदेशातील जास्त निवडणूक टप्प्यांवरूनही घणाघाती आरोप केले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, मात्र अलीकडे संजय राऊत यांना कुणी गंभीरपणे घेत नाहीत, असा टोला पाटलांनी लगावला आहे.
आगामी निवडणुकातही शिवसेनाही उतरणार आहे, त्यावरून त्यांनी शिवसेनालाही जोरदार टोला लगावला आहे, सेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी दरवेळेस डिपॉझिट घालण्यासाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते डिपॉझिट घालवतात, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी संविधान मानत नसले तरी आम्ही मानतो, विरोधकांना त्यांच्या सोयीनुसार झालं की मग योग्य वाटतं असेही ते म्हणाले तसेच संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतंय, अशी कोपरखिळीही त्यांनी लगावली आहे.