
नवी दिल्ली : मोदी सरकार सत्तेत येऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. याच पार्श्वभूमीवर देशात कोणताही जल्लोष,उत्सव साजरा न करता कोरोना काळात लोकांची मदत करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशातील सर्व शासित राज्यांतील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आदेश देण्यात आलेत. त्यात असे म्हटले आहे की, आज कोणत्याही प्रकारचा जल्लोष किंवा कोणत्याही प्रकारचा उत्सव, कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये. त्याऐवजी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची मदत करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदारांना प्रत्येकी दोन गावात जाऊन तिथल्या लोकांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य, कोरोनाच्या काळात लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा प्रत्येक लहान लहान गावात पोहवणे,तसेच प्रत्यक्ष गावात जाणे शक्य नसल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गावातील लोकांशी संपर्क साधावा असे आदेश हायकमांडकडून देण्यात आले आहेत.
गेल्या सात वर्षात मोदी सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय देशातील नागरिकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून आले. तर कोरोनाचा काळात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




