स्पोर्ट्स

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात शार्दूल ठाकूरचा समावेश

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिले आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याआधीच अंतिम १५ खेळाडूसंह ३ राखीव खेळाडूंची यादी जाहीर केली होती. पण भारतीय संघ हा थेट सुपर-१२ मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभा भारताला होती. त्यात आय़पीएलमधील खेळाडूंच्या प्रदर्शनानंतर संघात बदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसारच पहिला बदल झाला असून शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्यात आलं असून अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आलं आहे.

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन

राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button