Top Newsराजकारण

शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून शरद पवारांच्या बैठकीची पोलखोल !

तिसऱ्या आघाडीसाठी बैठक नव्हती, राष्ट्रमंचच्या नेत्यांचा दावा; शत्रुघ्न सिन्हा म्हणतात तिसऱ्या आघाडीचा आरंभ

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नव्हती. भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत, पण व्हिजन नाही. देशाला व्हिजन देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही देशाला व्हिजन देऊ, असा दावा राष्ट्रमंचच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे. तिसऱ्या आघाडीचा आरंभ सुरू झाला आहे. यात अजून लोक जोडले जातील. ही मोहीम संपूर्ण देश ढवळून काढेल, असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना म्हटले आहे की, यशवंत सिन्हा हे स्टेट्समन आहेत. त्यांच्या आणि देशातील सर्वात मोठे राजकीय चाणक्य शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्वजण एकत्र येत आहेत. सर्वांची एकजूट होणं ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. आज सुरुवात झालीय. यापुढे आणखी लोक यात समील होतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे. त्याही आमच्यासोबत आहेत. जर नसतील तर येतील, असा दावाही त्यांनी केला.

देशात काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मीही या बैठकीला जाणार होतो. पण काही कारणास्तव पोहोचू शकलो नाही. मात्र, या घडामोडीतून चांगलं निष्पन्न होईल. दक्षिण भारतातील बहुतेक पक्षही जोडले जातील. भाजपने धन शक्ती आणि भय शक्तीचा प्रयोग केला. मात्र, आता काही लोकांचे डोळे उघडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत लोकांना फोडलं जातं. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसमधील नेतृत्वाचं संकट दूर होईल

तुम्ही तुमच्या वैचारिक आस्थेने एखाद्या पक्षात आला तर ठिक आहे. सध्या सर्वात प्रतिभावान लोक काँग्रेसमध्ये आहेत. यातील काही लोकांची नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यावर तोडगा निघेल. आता मुद्द्यापासून दूर होऊन चालणार नाही. काँग्रेसमधील नेतृत्वाच्या संकटावर मात केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तिसऱ्या आघाडीसाठी बैठक नव्हती; राष्ट्रमंचच्या नेत्यांचा दावा

शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची अडीच तास बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माजिद मेमन, पवन वर्मा आणि समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती दिली. ही बैठक मोदी किंवा भाजपविरोधातील नव्हती. पवारांच्या घरी बैठक झाली, पण पवारांनी बैठक बोलावली नव्हती. ही राष्ट्रमंचची बैठक होती. आम्ही त्याचे सदस्य म्हणून त्यात सहभागी झालो होतो, असं माजिद मेमन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.

पवार तिसरी आघाडी करत असून काँग्रेसला एकटं पाडलं जात आहे, अशी चर्चा आहे. तीही चुकीची आहे. या बैठकीला काँग्रेसच्या पाच खासदारांना आमंत्रण दिलं होतं. कपिल सिब्बल, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिषेक मनू सिंघवी यांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला किंवा काँग्रेसला एकटं पाडलं या वृत्तात काही तथ्य नाही, असं सांगतानाच देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावरही चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आजच्या बैठकीत अल्टरनेट व्हिजन तयार करण्यावर चर्चा झाली. यशवंत सिन्हा हे टीम स्थापन करून प्रत्येक मुद्द्यावर देशाला मजबूत व्हिजन देतील. तरुणांमध्ये व्हिजनचा अभाव असून नये यासाठी हा प्रयत्न असणार आहे. अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ आदींबाबत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील टीम देशाला व्हिजन देणार असल्याचं घनश्याम तिवारी यांनी स्पष्ट केलं.

पवारांनी पत्रकार परिषद टाळली !

पवारांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. तोपर्यंत मीडियाचे प्रतिनिधी पवारांच्या घराबाहेर उभे होते. या बैठकीनंतर पवार मीडियासमोर येतील असं वाटत होतं. मात्र, पवारांनी मीडियासमोर येणं टाळलं. तर यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक करून अधिक बोलण्यास नकार देऊन पत्रकार परिषदेतून अंग काढून घेतलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button