ठाकरे सरकारला शरद पवारांचा पूर्ण आशीर्वाद, नाराजीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : संजय राऊत
मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारासमोर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु ही अफवा असल्याचे शिवेसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले होते. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण ,पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी यशस्वी पार पाडणार यात शंका नाही केवळ अफवांवर विश्वास ठेवू नका असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेकडूनच प्रयत्न केले जावेत का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कर्तव्य नाही का? अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या समोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ‘तुम्हाला सरकारकडून असे कळवण्यात आले आहे का? अफवांवर विश्वास ठेवू नका? अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले होते. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चा नाही आहेत आणि शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
खासदार संभाजीराजेंची शरद पवारांना भेट
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शरद पवारांना सांगितले की, मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे. तसेच एकंदरीत त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगितली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांसारख्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असेही राजेंनी शरद पवार यांना सांगितले आहे.