शरद पवारांची प्रकृती स्थिर; आगामी काळात पुन्हा शस्त्रक्रिया होणार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar Symptomatic Gallstones) यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर एण्डोस्कोपी (endoscopy) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आगामी काळात ते हळूहळू रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर (gall bladder)सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या चमूचे आभारही मानले. तर, राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधाताना दिली.
शरद पवार हे मंगळवारी (30 मार्च) संध्याकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही उद्या शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. त्यांच्या पित्तनलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढून. यामुळे पवार यांच्या लिव्हरवरचा दाब कमी होणार आहे. त्यांना झालेली कावीळसुद्धा कमी होईल. तसेच pancreatitis सुद्धा कमी होईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.