मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत विधान करणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. यापूर्वीही पवारांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावे लागते. पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही, अशी बोचरी टीका भाजपचे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करताना, हे विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला होता. सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना खोचक शब्दात टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून सक्रिय नसल्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यावरही सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केलं. कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.