मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उद्या दिल्लीत भेट होणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
ममता बॅनर्जी दिल्लीत आहेत, भेटणार आहात का? असा प्रश्न शरद पवारांना करण्यात आला. याला उत्तर देताना शरद पवार यांनी उद्या दिल्लीला जाणार असल्याच सागितलं. ममता बॅनर्जी यांचा मागच्या आठवड्यात फोन आला होता. तेव्हा त्यांनी दिल्लीत येत आहे, भेटू, असं म्हणाल्या होत्या. उद्या दिल्लीत जातोय. उद्या कदाचित भेट होऊ शकते, असं शरद पवार यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी उद्या २८ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता दिल्लीच्या चाणक्यपुरीमधील बंग भवनमध्ये परततील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते पी. चिदंबरम, टीआरएस, आरजेडी, सपा, आम आदमी पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तृणमूलचे अखिल भारतीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे या बैठकीचे संयोजक असल्याचं सांगितलं जात आहे.