मुंबई : पंजाबमधील राजकीय घडामोडींवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यावरुन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंजाबमधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा २० मिनिटे थांबून होता. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितलं की, तिथून पाकिस्तानची सीमा १० किलोमीटर अंतरावरच होती. आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, याची दखल देशपातळीवर घेतली जावी. पंतप्रधानांवरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो. काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदी आले आहेत. या आशीर्वादामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.
पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना या देशातील जनता कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. एवढी मोठी घटना घडूनही त्या राज्याचे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत, याची जेवढी निंदा केली जावी, तेवढी कमीच असेल, असंही ते म्हणालेत. काँग्रेसचं घे घाणेरडं राजकारण आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही. काँग्रेसचे नेते जी वक्तव्य आता करत आहेत, ती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस जो खेल करू इच्छित आहे, तसाच खेळ ८० च्या दशकात काँग्रेसने केला होता. याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.
पंजाबमधील एका ठिकाणी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक ही सभा रद्द करावी लागली होती. मोदींचा ताफा पंधरा ते वीस मिनिटं एका फ्लायओव्हरवर अडकला होता. ही मोदींच्या सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, यामुळे मोदींची सभा रद्द करुन त्यांनी माघारी परतावं लागलं होतं. त्यानंतर आता सर्वच थरातून ही घटना वादात आली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवढणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याचप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पंतप्रधान नरेंद्र यांनी भेटही घेतली आहे.