Top Newsराजकारण

डोकं फोडून टाका; शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकावरून मागील १० महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु भाजपाशासित हरियाणा राज्यात शेतकरी आणि पोलीस यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. आता याठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अटक करण्याचा आरोप पोलिसांवर लावण्यात आला आहे. त्यातच हरियाणातील करनालमधील एक व्हीडिओ समोर आला आहे.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओवरुन नेटीझन्सनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात करनालचे उपन्यायदंडाधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलकांची डोकी फोडा असे आदेश देताना दिसत आहेत. एसडीएम आयुष सिन्हा यांच्या व्हीडिओनंतर सोशल मीडियात आंदोलक शेतकऱ्यांचे रक्तबंबाळ झालेले अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हिडीओही शेअर केला जात आहे.

दिल्लीतील आम आदमी पार्टीचे आमदार नरेश बालियान यांनी या घटनेचा व्हीडिओ शेअर केला आहे. त्याच उपन्यायदंडाधिकारी पोलिसांना म्हणताना दिसतात की, सरळ गोष्ट आहे याठिकाणाहून कुणीही पुढे जाणार नाही, मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा, मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे, मी लिखित सांगतो की, सरळ काठी डोक्यात मारा, काही शंका? उचलून मारा, कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका. आपण दोन दिवसांपासून इथं ड्युटी करतोय. येथून कुणीही पुढे जायला नाही पाहिजे. जर गेलाच तर त्याचं डोकं फुटायला हवं असं व्हीडिओत म्हणताना दिसत आहे.

हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपाविरोधात काही शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतर जेव्हा शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली, रक्त वाहिलं. जखमी शेतकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आयुष सिन्हा यांचा बचावात्मक पवित्रा

सोशल मीडियात व्हायरल व्हीडिओनंतर आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांना विचारण्यात आले असता त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दगडफेक सुरु केली होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा बळाचा वापर करावा असं कर्मचाऱ्यांना सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button