मुंबई : ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक गुन्ह्याची नोंद असणारे नेते भाजपचे आहेत, असा पलटवार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्य सरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला होता. त्याला मलिक यांनी चोख उत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे, अशी टीकाही मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही टीका केली आहे. ईडी व सीबीआय यांचा देशातील तपास ज्या पध्दतीने सुरू आहे, त्यावर सुप्रीम कोर्टाने शंका निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही एजन्सींना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका घेतली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.
ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित होते आहे. खडसे यांची संपत्ती जप्त करण्यात आली तर काहींना वारंवार बोलावून त्रास दिला जात आहे. अशा प्रकारे राजकीय दबावाने काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत, असा पलटवारही मलिक यांनी केला आहे.
गुजरातमध्ये दाऊदचा हस्तक मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्यापध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता. त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदी मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत, असा दावाही त्यांनी केला. भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत, याची आठवणही त्यांनी पाटील यांना करून दिली.