जेष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार
मुंबई : राज्य शासनाचा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेल्या ‘लोकराज्य’यावेळी भेट म्हणून देण्यात आले.
भारतरत्न लता मंगेशकर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या आशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती आहेत. आणि त्यामुळेच आशा भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासन महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीतातले दिग्गज यांची मदत घेतली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी सांगितले.