शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन
मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं आज निधन झालं आहे. ते ८१ वर्षाचे होते. शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.
मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालवली होती. त्यांना कोरोनाचा संसर्गही होऊन गेला होता. सुधीर जोशी यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती.
सुधीर जोशी हे शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. पहिल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपदही भूषावले आहे. त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे. सुधीर जोशी यांनी १९९९ मध्ये आजारपणामुळे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केलं. १९७२ मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. १९६८ पासून ते विधान परिषद सदस्य होते. १९९२-९३ या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.
राज्याच्या राजकारणात सुधीर जोशी आणि मनोहर जोशी या बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांबाबत एक किस्सा सांगितला जातो. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु होता. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू घसरली होती. तर दुसरीकडे बाळासाहेबांनी मतदारांना आपल्याच उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं. बाळासाहेबांनी ‘आई जगदंबेला आता सत्ता मिळाली नाही तर पुन्हा दर्शनाला येणार नाही’, असं बजावलं होतं. तर पुन्हा मतं मागायला येणार नाही अशा शब्दात बाळासाहेब मतदारांना आवाहन करत होते.
त्या निवडणुकीत अखेर शिवसेना आणि भाजपच्या प्रयत्नांना यश आलं. या निवडणुकीत काँग्रेस ८० जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना ७३ आणि भाजपला ६५ जागा मिळाल्या. युतीच्या मिळून आमदारांची संख्या १३८ वर पोहोचली. तेव्हा राज्यात शरद पवार यांच्या पुलोदनंतर दुसऱ्यांदा बिगर काँग्रेसी सरकार येणार हे निश्चित होतं. पण बहुमत नसल्यामुळे अपक्ष आमदारांना सोबत घेणं अपरिहार्य होतं. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आपण कुठलंही सत्तापद भूषवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याला पडला होता. मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली. तेव्हा सर्व आमदार आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. तेव्हा ‘मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवाय. मुख्यमंत्री कोणीही होवो, सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच राहात राहणार’ असं बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं.
बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी आणि मनोहर जोशी अशी दोन नावं चर्चिली जात होती. तेव्हा सुधीर जोशी म्हणजे साधा माणूस आणि मनोहर जोशी म्हणजे चतुर माणूस असं या दोघांबाबत बोललं जात होतं. तत्पूर्वी १९७३ मध्ये जेव्हा मुंबईच्या महापौर पदाची जबाबदीर देण्यासाठी नावांची चाचपणी सुरु होती. तेव्हा बाळासाहेबांनी ज्येष्ठ असणाऱ्या मनोहर जोशींना डावलून अवघ्या बत्तीस वर्षीय सुधीर जोशींना महापौर केलं होतं. तेव्हापासून सुधीर जोशी यांची शिवसेनेतील स्थान वाढलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळही सुधीर जोशींच्याच गळ्यात पडणार अशी चर्चा सुरु होती. खुद्द मनोहर जोशीही म्हणाले होते की, बाळासाहेब मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशींचाच विचार करत होते. मात्र, बहुमताचा आकडा गाठता आला नसल्यामुळे कुणीतरी चतुर माणूस मुख्यमंत्रीपदावर असायला हवा असं बाळासाहेबांना वाटत होतं.
..आणि बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीपदासाठी मनोहर जोशींच्या नावाची घोषणा केली
अपक्षांच्या बळावर सरकार चालवणं जिकरीचं असल्यामुळे मनोहर जोशी यांच्यासारखा धूर्त, खाचखळगे माहिती असणारा माणूस योग्य ठरेल. ते यशस्वीपणे सरकार चालवतील असं बाळासाहेब यांनी निकटवर्तीयांनाही सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी शिवसेना भवनात नेता निवडीची बैठक सुरु झाली होती. तरी अजूनही ठोस निर्णय झाला नव्हता. मात्र, बाहेर सुधीर जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. इतकंच नाही तर बाळासाहेब सुधीर जोशी यांचंच नाव जाहीर करतील अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, बैठकीत बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती दिली आणि सुधीर जोशी यांना मनोहर पंतांच्या सरकारमध्ये महसूल मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.