काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते. काँग्रेसला महाराष्ट्रात पुढे नेण्याच्या कामात त्यांचा मोलाचा हातभार लागला होता. मुंबईमध्ये त्यांच्या नावाला असणारं वजन पाहता, मुंबई प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. शिवाय त्यांच्या निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण-मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर राहिल्यानंतर राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं होतं. १५ हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलेलं. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी कोर्टात हमी दिली होती.