Top Newsराजकारण

भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन

उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा; उद्या अंत्यसंस्कार

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही डॉक्टरांच्या संपर्कात होते. परंतु शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, २३ ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवही ठेवण्यात आलं होतं, शिवाय हाय प्रेशर ऑक्सिजनही देण्यात आलं होतं. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली.

कल्याण सिंह यांना ४ जुलै रोजी एसजीपीजीआय लखनौ येथे दाखल करण्यात आलं. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता.

उद्या अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात माहिती देताना, कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. त्यांच्यावर २३ ऑगस्टला सायंकाळी नरोरा येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, २३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल, असे म्हटले आहे. कल्याण सिंह यांचे पार्थिव सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. यानंतर, रविवारी लोकांना आदरांजली देता यावी यासाठी विधानसभा आणि लखनौ येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल. यानंतर सायंकाळी त्यांचे पार्थिव अलीगढ आणि त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी अत्रौली येथे नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

अलीगढमध्ये झाला होता जन्म

उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा ५ जानेवारी १९३२ रोजी जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.

युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्री

कल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते.

दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही : पंतप्रधान मोदी

कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. मी माझं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. कल्याण सिंह हे राजकारणी, अनुभवी प्रशासक आणि महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी त्यांचे सुपुत्र राजवीर सिंह यांच्याशीही संवाद साधला आणि शोक व्यक्त केला, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

विचारधारेपुढे सत्ता गौण, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी दिली : गडकरी

आदरणीय कल्याण सिंहजी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. उत्तर प्रदेशात जनसंघ आणि भाजप उभा करण्यात कल्याण सिंहजी यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली. समर्पित राम भक्त, मातीशी नाळ असणारे खरे लोकनेते कल्याण सिंहजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

खरा राष्ट्रभक्त, धर्मनिष्ठ राजकारणी गमावला : अमित शाह

कल्याण सिंह यांच्या निधनामुळे देशानं एक खरा राष्ट्रभक्त, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे एक असे विराट वटवृक्ष होते, ज्यांच्या भाजपचं संघटन अधिक वाढलं. राष्ट्रवादाचे खरे उपासक म्हणून त्यांनी जीवनभर देशाची आणि जनतेची सेवा केली असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकसभा अध्यक्षांकडूनही श्रद्धांजली

कल्याण सिंह यांच्या निधनानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. कल्याण सिंह यांच्या माध्यमातून आम्ही असं विराट व्यक्तीमत्व पाहिलं ज्यांनी आपल्या राजकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर एक छाप सोडली. इश्वर त्यांच्या आत्म्यास शआंती देवो,” असं म्हणत बिर्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button