Top Newsराजकारण

शिवसेना भवनवर भाजयुमोचा मोर्चा; सेना – भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.

भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतल्यानंतर, दोन्ही पक्षात प्रचंड धुमश्चक्री उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या शुल्लक राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे, हा तीव्र निषेध भाजप शिवसेना भवन समोर करत आहे, असं भाजप युवा मोर्चाने म्हटलं आहे.

भाजपचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले. जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्यानेच शिवसैनिक सेना भवनासमोर जमले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात मोठी धुमश्चक्री उडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे सेना भवनासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवांनाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

त्यानंतर दुपारी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले. दरम्यान, पोलिसांची व्हॅन या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली. तेव्हा व्हॅन येताच काही शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. आंदोलकांना पकडण्यासाठी शिवसैनिक धावले होते. मात्र, व्हॅन सुसाट गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाती लागले नाहीत.

दरम्यान, मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारलं असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे खपवून घेणार नाही : प्रवीण दरेकर

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे केवळ पक्षाचे अध्यक्ष नाहीत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सरकार आमचं आहे आम्ही वाटेल ती दादागिरी करु, अशी भूमिका असेल तर ती खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरकेर यांनी दिला आहे. भाजप कार्यालयाबाहेरही आंदोलन झाली. आंदोलकांच्या अंगावर जाणार त्यांना मारहाण करणार, धाक दपटशाह करणं योग्य नाही, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असं प्रविण दरेकर म्हणाले. काही कार्यकर्त्यांची कपडे फाडली असल्याचं समोर आलं आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी. दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कळस घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमचा आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्यावर मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असं दरेकर म्हणाले.

अरविंद सावंत यांचे प्रत्युत्तर

मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? हा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी, इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं. प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली? असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला. जर कुणी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसैनिक आपल्या स्टाईलने उत्तर देईलच, ही त्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

शिवसेनेची मागणी

राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आलं आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button