मुकुल रॉय यांनी सोडली केंद्र सरकारची सुरक्षा; ममता सरकार संरक्षण देणार
कोलकाता : नुकताच मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २४ तासांच्या आतच मुकुल रॉय यांनी त्यांना केंद्राकडून देण्यात आलेली सुरक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे त्यांना ममता बॅनर्जी सरकारनं त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या पोलिसांची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासूनच मुकुल रॉय यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील कांचरापारा येथील निवासस्थानी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
सचिवालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकुल रॉय यांना राज्य सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. परंतु अधिकृतरित्या या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मुकुल रॉय यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानंतर बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती.
मुकुल रॉय यांनी स्वत: केंद्राकडून मिळणारी सुरक्षा सोडल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, शनिवारी रॉय यांना त्यांची सुरक्षा काढून घेतली जाणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी याची आपल्याला कल्पना नसून आपणच सुरक्षा सोडणार आहोत असं त्यांनी म्हटलं. मुकुल रॉय यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान तृणमूल भवन आणि त्यांच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली होती.