शारजाह : बांगलादेशला गट १ च्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडनं पाणी पाजले. ६ बाद ५३ धावसंख्येवरून स्कॉटलंडनं जबरदस्त कमबॅक करून ९ बाद १४० धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर बांगलादेशला रोखून दणदणीत विजय साजरा केला. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या ख्रिस ग्रेव्हेस आणि मार्क वॅट यांनी गोलंदाजीतही योगदान देत अष्टपैलू कामगिरी करत स्कॉटलंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ब्रॅड विलनं १९व्या षटकात दोन धक्के देत बांगलादेशच्या विजयाच्या आशाही मावळून टाकल्या. विलनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीला बोलावलं. कायले कोएत्झर (०), मॅथ्यू क्रॉस (११), रिची बरींग्टन (२), कॅलम मॅकलीओड (५), मिचेल लिस्क (०) व सलामीवीर जॉर्ज मुन्सी (२९) हे धावफलकावर ५३ धावा असताना माघारी परतले. या सहा विकेट्समध्ये मेहदी हसननं (३-१९) आणि शाकिब अल हसननं (२-१७) मिळून पाच विकेट्स घेतल्या. ख्रिस ग्रेव्हेस आणि मार्क वॅट यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून स्कॉटलंडला शतकी पल्ला पार करून दिला.
वॅट २२ धावांवर माघारी परतला, परंतु ग्रेव्हेसनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्कॉटलंडनं २० षटकांत ९ बाद १४० धावा उभ्या केल्या. शाकिबनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. त्यानं श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचा १०७ विकेट्सचा विक्रम मोडला. शाकिबनं ८९ सामन्यांत १०८ विकेट्स घेतल्या आहेत.
स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशलाही दणके दिले. लिटन दास ( ५) व सौम्या सरकार (५) यांना अनुक्रमे ब्रॅड विल व जोश डॅव्हेय यांनी माघारी पाठवून बांगलादेशची अवस्था २ बाद १८ धावा केली. शाकिब व मुस्ताफिजूर रहीम यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ख्रिस ग्रेव्हेसच्या गोलंदाजीवर कॅलम मॅकलिओड यानं अफलातून झेल टिपून शाकिबला ( २०) माघारी जाण्यास भाग पाडलं. हा धक्का कमी होता की काय, पुढील षटकात ग्रेव्हेसच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रहीम (३८) त्रिफळाचीत झाला. आता बांगलादेशला विजयासाठी अखेरच्या सहा षटकांत १०च्या सरासरीनं धावा करायच्या होत्या.
बांगलादेशला १८ चेंडूंत विजयासाठी ३७ धावा हव्या होत्या आणि महमदुल्लाह व आसीफ होसैन ही जोडी खिंड लढवत होती. झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात आसीफनं (१८) विकेट टाकली. बांगलादेशला १२ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या. मार्क वॅटनं १९ धावांत १ विकेट घेतली. जोश डॅव्हेयनंही २४ धावांत १ बळी टिपला. १९ व्या षटकाच्या दुसऱ्याच षटकात नुरूल हसन (२) सीमारेषेवर मॅकलिओडनं अफलातून झेल टिपला.