ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ओमायक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील शाळा या येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाण्यात शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, उपायुक्त मनीष जोशी , शिक्षणविभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत बैठक पार पाडली. या बैठकीत मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील शाळा सुद्धा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनाने १ डिसेंबरपासून राज्यातील १ ली ते ७ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १५ डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही मुलांच्या आरोग्याची काळजी घेवून ठाण्यातही येत्या १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.