नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायमूर्ती होऊ शकतात. नियुक्ती झाल्यास ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायमूर्ती असतील.
या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कॉलेजियमची बैठक ११ नोव्हेंबरला झाली. ज्यामध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते.
याआधी चारवेळा कृपाल यांच्या नावाची न्यायमूर्ती बनण्याबाबत चर्चा झाली होती. परंतू याबाबत मते विभागली गेली होती. सौरभ कृपाल यांच्या नावाची कॉलेजियमने पहिल्यांदा २०१७ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी शिफारस केली होती.
सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर (कायदा) पदवी मिळविली. त्यांनी दोन दशके सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. त्याचबरोबर त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघासोबतही काम केले आहे. सौरभच यांना ‘नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारतीय संघ’ या खटल्यासाठी ओळखले जाते. कलम ३७७ हटवण्यासाठी याचिकाकर्त्याचे ते वकील होते. सप्टेंबर २०१८ मध्ये कलम ३७७ बाबतचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.