
पुणे : पुण्यात कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे. परंतु अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात शनिवार रविवार दुकाने राहणार बंद राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व सुरु राहील. पुढील आठवड्यातही हीच परिस्थिती राहणार आहे. परंतु कोरोना परिस्थिती काही दिवसांत नियंत्रणात आलीच तर या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केले.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर तर काही प्रमाणात पुण्यातही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. शनिवार, रविवार महाबळेश्वर, खंडाळा, लोणावळा, खोपोलीत नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. परंतु नागरिकांना कोरोनाची स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्याबाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात पुण्यातूनही नागरिक देवदर्शन, ट्रेकिंगच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत अशा लोकांना पुन्हा पुण्यात आल्यास १५ दिवस क्वारंटाईन केले जाणार असून तसेच आदेशही काढले जातील.असा इशाराही त्यांनी दिला.
विदेशात कोरोना लसीकरणानंतर ही तिसरी लाट आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खरंच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षापेक्षा कमी वयोगटातील आहेत. म्हणजेच ३० ते ६० , २५ ते ६० वयोगटातील सर्वाधिक मृत्यू आहेत. ४३ टक्के मृत्यू हे कोणत्याही कोमॉर्बिडिटी नसलेल्या रुग्णांचा झाला आहे. २० टक्के मृत्यू ३१ ते ४५ वयोगटातील रुग्णांचा झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेतही महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधित आहे. गृहविलगीकरणात असलेल्य़ा रुग्णांमध्ये लक्षणे वाढू लागल्यास अथवा एसपीओटू लेवल ९४ टक्क्यांपेक्षा खाली आल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.