उत्तराखंड भाजपमधील ३५ आमदारांचे बंडाचे निशाण; सतपाल महाराज दिल्लीत दाखल
देहरादून : उत्तराखंडमध्ये नवा मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपामध्ये मोठी नाराजी उफाळली आहे. धामी यांची निवड अनेक जुन्या नेत्यांना रुचलेली नसल्याने सतपाल महाराजांच्या नेतृत्वाखाली ३५ आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत दिल्लीत ठाण मांडून बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सतपाल महाराज दिल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे पुष्कर सिंह धामी यांनी माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांची भेट घेतली आहे. धामी यांचे नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले तेव्हापासून भाजपाचे वरिष्ठ मंत्री तरुण मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात रहावे की नाही यावर विचार करत होते. यामुळे या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण असावा हे ठरविण्यासाठी गुप्त बैठकही घेतल्याची चर्चा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सतपाल महाराज आणि हरक सिंह रावत यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. गृहमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांना नव्या मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्यास सांगितले आहे. भाजपातील काही आणखी वरिष्ठ नेते देखील धामी यांच्या नियुक्तीवर असंतुष्ट आहेत. त्यांच्या नेतृत्वात मंत्री होण्यासदेखील कचरत आहेत. सतपाल महाराज अमित शहांना भेटले असले तरीदेखील दिल्लीतच थांबलेले आहेत. अन्य मंत्रीदेखील नाराज आहेत. आज सायंकाळी धामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे त्यांच्यासोबत कोण कोण शपथ घेतात आणि त्या कार्यक्रमाला जातात याकडे साऱ्यांची लक्ष लागले आहे.
तीरथ सिंह रावतांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले बंशीधर भगत यांना ३५ आमदारांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मी कुठेतरी वाचलेय की ३५ आमदार दिल्लीला गेले आहेत. हे कोण आहेत त्यांची नावे सांगा, या केवळ अफवा आहेत. आज केवळ मुख्यमंत्रीच शपथ घेणार आहेत.