मुंबई : जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार, अजितदादा आणि राष्ट्रवादीला किरकोळीत घेणाऱ्या आणि सातारा जिल्ह्यातील अख्खा पक्षच मोडायला निघालेल्या राजेगटाला जिल्हा बँकेत ‘पवारसाब और अजितदादाने मिलकर एकही मारा लेकीन सॉलिड मारा’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हयात घालविलेल्या ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्त्याने ‘डीजी२४’शी बोलताना व्यक्त केली.
त्यांनी ‘डीजी२४’ला सांगितले असे की, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी पक्ष गाडायला निघालेले आहेत. अगोदर आपल्या जावयाला त्यांनी भाजपमध्ये पाठविले. मग त्यांनी शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे यांना भाजपमध्ये धाडले. जिल्हा बँक पूर्ण ताब्यात रहावी म्हणून भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याशी गुप्त आघाडी केली. स्वतः सह अकरा जागा बिनविरोध निवडून आणल्या. राष्ट्रवादीच्या चार जागा पाडल्या. अजितदादा पवार यांनी उमेदवारी नक्की केलेले नंदू मोरे यांना पाडण्यासाठी प्रभाकर घार्गे यांना तुरुंगातून निवडणूक लढायला लावून मोरे यांना पाडले. अजित पवार यांनी उमेदवारी नक्की केलेल्या शिवाजी महाडिक यांना आमदार महेश शिंदे यांच्याकडून, तर शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रसिंहराजे यांच्याकरवी पाडले. माणची जागाही पराभूत झाली.
विधानसभेला प्रभाकर देशमुख आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव करून राष्ट्रवादीशी गद्दारी केली होतीच. तसेच पहाटेच्या शपथविधीच्या वेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांना अज्ञातस्थळी ठेवले होते. बँकेची निवडणूक झाल्यावर शिवेंद्रसिंहराजे यांना जाहीरपणे अध्यक्षपद मागायला लावून सातारा जिल्हा बँक फडणवीस आणि अमित शहाच्या चरणी वाहायला रामराजे निघाले होते. पण पवार चुलत्या पुतण्यांनी राष्ट्रवादी आणि कुटुंबाशी एकनिष्ठ अशा माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबातील नितीन पाटील यांना अध्यक्ष करून तीन राजांना एकच मारली, पण सॉलिड मारली. ही एकच मारताना राजेमंडळींच्या गेल्या चार वर्षातील गद्दारीची आठवण करून दिली. यात महत्वाचे म्हणजे फलटणमध्ये पवारसाहेब यांच्या सभेत गोंधळ घालण्यामागे कोण होते? पवारसाहेब यांनी माढा मतदारसंघातुन माघार कुणामुळे घ्यावी लागली, हे अधोरेखित केले.
पवारसाहेब यांच्या दणक्याने राजांच्या समोर दिवसा चांदण्या चमकल्या आहेत. हे करताना साहेबांनी पालकमंत्री, खासदार, आजी आणि माजी आमदार यांनाही कुणकुण लागू दिली नव्हती, अशी माहिती या ज्येष्ठ कार्यकर्त्याने ‘डीजी२४’शी बोलताना दिली.