ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार

मुंबई : मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना 2020 वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. शरणकुमार यांच्या‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शरणकुमार लिंबाळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सरस्वती पुरस्कार 2020 ज्या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे ती ‘सनातन’ ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर आधारित आहे. देशातील स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकताना दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान प्रकर्षाने पुढे आले नाही. सनातन कादंबरीमध्ये दलित आणि आदिवासींच्या योगदानाचा उल्लख आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी जन्म झाला. जातीव्यवस्था आणि सामाजिक उतरंड यावर लिंबाळे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या लेखणीने प्रहार केला आहे.
या पुरस्काराविषयी बोलताना लिंबाळे म्हणाले, ”सनातन’ ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान यावर फार काही उल्लेख आढळत नाही.’ ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केल्याचे लिंबाळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
ते १९८६ ते १९९२ या दरम्यान सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘अक्करमाशी’चे विविध भाषांत भाषांतरे झाली. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर आणि २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. बार्शी येथे २०१०मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद शरणकुमार लिंबाळे यांनी भूषवले होते.