लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार, व्यक्तिगत हल्ला चुकीचा : शरद पवार

मुंबई: नाशिक येथे सुरु असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या काही कर्यकर्त्यांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. यानंतर आता विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेवर बोलताना लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे म्हटले आहे.
अशी काही घटना घडेल याची कुणकुण होती. संभाजी ब्रिगेडचा त्यांच्याशी काही तरी वाद आहे. पण संभाजी ब्रिगेड त्यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडतील असे वाटत होते. पुण्यातून दोन जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झाले आणि या दोघांनी त्यांच्यावर काळी पावडर फेकली. पंकज भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत हे लोक काळी पावडर फेकून पळून गेले, असा घटनाक्रम छगन भुजबळ यांनी सांगितला.
लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला विरोध करण्याचाही अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ला चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच भाजप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्रे असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरे कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही.



