मुंबई : शर्मिला वहिनींनी माझी सर्व बाजू ऐकून घेतली. त्या मला नक्की न्याय देतील, अशी प्रतिक्रिया संजीवनी काळे यांनी दिली. संजीवनी काळे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी आहेत. काही दिवसांपूर्वी संजीवनी काळे यांनी आपल्या पतीवर घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा खळबजनक आरोप केला होता. त्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहे.
या पार्श्वभूमीवर संजीवनी काळे गेल्या काही दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. संजीवनी काळे शनिवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आल्या होत्या. मात्र, राज ठाकरे सध्या पुण्यात असल्यामुळे संजीवनी काळे यांना त्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे संजीवनी काळे यांनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. शर्मिला ठाकरे यांनी माझी सर्व बाजू ऐकून घेतली. त्यांनी मला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी प्रतिक्रिया संजीवनी काळे यांनी कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली.
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून ते शनिवारी रात्री मुंबईत परतणार आहेत. संजीवनी काळे यांनी शर्मिला ठाकरे यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. शर्मिला ठाकरे यांनी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. राजसाहेब आज रात्री मुंबईत येतील. त्यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच संजीवनी काळे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेतली होती. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.