Top Newsराजकारण

फडणवीसांच्या अभ्यासू वृत्तीवर संजय राऊतांचे खरमरीत टीकास्त्र

नवी दिल्ली: कोण काय बोलतंय याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी काय बोललो ते समजून घ्या आधी. या देशात एकापेक्षा जास्त नेते असू शकत नाहीत का? भाजपच्या काळात अटलबिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का? भाजपने राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा नीट अभ्यास करून बोलावं. कोणत्याही गोष्टीवर उटपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं,’ असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर, ‘उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, असं वाटत असेल तर चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’, असा टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगवाला होता. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या देशात राज्यांचा मुख्यमंत्री जो कोणी असतो तो राष्ट्रीय नेताच असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचंही नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जात होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्व देशातील विरोधी पक्षनेते फार अपेक्षेने पाहतात. शरद पवार तर या सर्वांच्या वर आहेत. कधी तरी भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. आज पाच पंचवीस झाले, आज आमचे १८ खासदार आहेत. अनेकदा प्रादेशिक पक्षाचे लोकंही दिल्लीतून नेतृत्व करताना पाहिलं आहे, असंही राऊत म्हणाले.

काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या. ‘उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे’, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले होते, ‘उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, असं वाटत असेल तर चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button