Top Newsराजकारण

फकीर (?) प्रधानसेवकाचा भ्रम आणि भ्रमंती !

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला आता असे वाटू लागले की, त्यांचा पक्ष सत्तेवरून कधीच खाली उतरणार नाही. तो भ्रम आहे. प. बंगालात भाजपचा दारुण पराभव झाला. नरेंद्र मोदी यांचा चेहरा व अमित शहा यांची दबंग चाणक्य नीती सर्वत्र चालतेच असे नाही हे प. बंगालने सिद्ध केले. कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काल भाजपचा पराभव झाला. भाजपस दहा जागाही कोलकाता म्युनिसिपालिटीत जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकीत भाजपची २० टक्के मते कमी झाली. चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा टक्का घसरला. तेथे ‘आप’सारख्या पक्षाने बाजी मारली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात नव्या वर्षात विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेथेही भाजपची घसरगुंडीच होईल असे स्पष्ट दिसते. २०१४ साली सुरू झालेल्या भाजपच्या प्रवासाचा आलेख २०२२ मध्ये खाली आलेला दिसेल, इतका रोष जनतेच्या मनात आहे, असं ‘रोखठोक’ मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ दैनिकाच्या आपल्या साप्ताहिक स्तंभात मांडले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून पंतप्रधानांवर टीकेचा बाण सोडला आहे. २०२१ साल सरले, पण २०२२ या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी १२ कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे. २८ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात.

२०२१ अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न २०२२ च्या झोळीत टाकून २०२१ सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. २०२० मावळताना २०२१ वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. २०२१ ने २०२२ ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे, असे ते म्हणाले.

पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अ‍ॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची १२ कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असंही ते म्हणाले.

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे ‘दर्शन’ पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. २०२२ सालात तरी शहाणे व्हा! भाजपचे नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button