मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाच्याही मध्यस्थीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्वाचं आहे, अशा शब्दात शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना टोला लगावताना यांचे अंदाज नेहमीच चुकत आले, आताही चुकतील, असे म्हटले आहे.
खा. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हा टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फार फार तर १०-१५ मिनिटे चर्चा होईल, असं भाजपचे राज्यातील नेते सांगत होते. मात्र, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी ९० मिनिटे चर्चा केली. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांचे महाराष्ट्राबाबतचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. आताही चुकतील, असा टोला राऊतांनी लगावला.
मोदी-ठाकरे संवाद वाढतोय ही चांगली गोष्ट आहे. हा संवाद असाच चांगला व्हावा. संघर्ष कायम नसतो. संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो. मोदींनी एक तास दिला. तुम्ही संघर्षाची भाषा कशाला करता? केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले होणं हे घटनात्मकदृष्ट्या चांगलं आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नात पंतप्रधानांनी कुणाच्याही मध्यस्थीशिवाय लक्ष घातलं. केंद्राशी संबंध राखणं ही कुणाची मक्तेदारी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
ठाकरे-मोदी जेव्हा भेटतात तेव्हा चर्चा होणारच. चर्चा होत असेल तर निश्चित ती भेट महत्त्वाची आहे, असं सांगतानाच एक तास शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची वन टू वन चर्चा झाली. दोन्ही चर्चा महत्त्वाच्या आहेत. राजकीय संदर्भ कुणाला काढायचा तो काढू द्यात, असं सूचक विधान त्यांनी केलं.
मोदी-ठाकरे यांच्यात गोपनीय चर्चा सुरू होती. तेव्हा महाराष्ट्राचे दोन शिलेदार बाहेर उभे होते. त्यामुळे चिंतेची गरज नाही, असं सांगतानाच चिंता करू नका. ठाकरे सरकार पाच वर्षे टिकेल, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
मोदींबद्दल आम्हाला देशाचे पंतप्रधान म्हणून नेहमीच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाळासाहेब आणि मोदींचं असलेलं नातं आमच्यापर्यंत झिरपत नाही का?, वाजपेयी आणि बाळासाहेबांची मैत्री होती. दोघांमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे मोदी-ठाकरे, ठाकरे-फडणवीस यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध असू नये का?, असा सवाल त्यांनी केला.