टाळी एका हाताने वाजत नाही; बंगालमधील हिंसेवरून राऊतांनी भाजपला फटकारले
मुंबई: निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालाबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्या, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली आहे. परंतु, या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे. केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे लागेल. बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी. कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावं. एकमेकांना धमक्या देणं थांबवावं, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
२०२४ ची निवडणूक आम्ही एकत्र मिळवून लढवू. राहिला नेतृत्वाचा प्रश्न तर दिल्लीत बसून कोण नेतृत्व करेल हे पाहावं लागेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
पूनावालांना महाराष्ट्रातून कोणी धमकी देणार नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. उलट महाराष्ट्रात व्हॅक्सिन तयार होत आहे. संपूर्ण देशासाठी व्हॅक्सिन तयार होत आहे. याचा आम्हाला अभिमानच आहे, असं सांगतानाच पूनावाला यांचं वक्तव्य गंभीर आहे. त्यांना कुणी धमकी दिली असेल तर त्याची चौकशी होईलच, असंही त्यांनी सांगितलं.
‘सामना’च्या अग्रलेखातूनही टीकास्त्र
दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही भाजपवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.