नवी दिल्ली: राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी मोदी सरकारवर व्यक्त केला.
संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा हल्ला राऊत भाजपवर यांनी चढवला.
राज्यसभेत रुल बुक फेकले असेल तर याचा अर्थ सरकारने नियमांचं पालन केलं नाही. रुल बुक वाचा आणि संसदेचं कामकाज चालवा यासाठी प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं असं म्हणणं आहे. कारण नियमानुसार काम चालत नव्हतं. काल पाच साडेपाच वाजता घटना दुरुस्ती बिलावर उत्तम प्रकारे आणि शांतपणे चर्चा सुरू होती. सहमतीने चर्चा सुरू होती. बहुमताने बिल मंजूर करून घेतलं. संपूर्ण विरोधी पक्षाने सहकार्य केलं. पण जे इन्श्युरन्स संदर्भातील बिल आहे. विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्याचं त्याला विरोध आहे. देशभरातून विरोध आहे. ते आज न आणता उद्या आणावं असं काल सकाळी ठरलं होतं. या बिलावर उद्या चर्चा करण्यावर सहमतीही झाली. जेव्हा एसईबीसी बिल मंजूर झालं. तेव्हा लगेच या बिलावर कारवाईला सुरुवात झाली. त्यावर सर्व विरोधक उठले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेही उठले. त्यांनी विरोध केला. पण सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे बिल रेटण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यातून भडका उडाला. सरकारने ठिणगी टाकण्याचं काम केलं, असा दावा त्यांनी केला.
आमचे लोकं कधी वेलमध्ये जात नाहीत. पण आमचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी काल वेलमध्ये गेले. का गेले? कारण अनिल देसाई हे विमा कंपन्याचे कर्मचारी वर्गाचे नेते आहेत. विमा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे देसाई वेलमध्ये उतरले. हे बिल थांबवा सांगण्यासाठी. पण तुम्ही धक्काबुक्की करता? महिला कमांडोज आणता समोर. लाज वाटली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारही अस्वस्थ
५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असंही त्यांनी सांगितलं.
या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्याबाबत राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते उसळलेच. तुम्ही चौकशी काय करणार? आमच्यामागे पेगासस लावलेलं आहे ना. अजून काय चौकशी करताय? कोण काय करत होतं हे तुम्हाला पेगाससच्या माध्यमातून दिसलं असेल ना? काय चौकशी करताय… आम्ही पेगाससची चौकशी मागतोय ती करा आधी. आमची कसली करताय?, असंही ते म्हणाले.
सोनिया गांधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
दरम्यान, विरोधकांची एकता मजबूत आहे. २० ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहेत. सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यात सामील होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.